निडगल : पत्रे उडाल्याने शाळेचे झालेले नुकसान. pudhari photo
बेळगाव

Rainfall in Khanapur | खानापुरात पावसाचे दमदार पुनरागमन

शहरासह ग्रामीण भागात तासभर बरसला : शेतकरी सुखावला

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : पेरणीची कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना बुधवारी (दि. 11) दुपारी चारच्या सुमारास तासभर कोसळलेल्या संततधार पावसाने दिलासा दिला. पेरणी झालेल्या भाताला अंकुर येण्यासाठी पावसाची नितांत गरज होती. ती पावसाच्या दमदार हजेरीने पूर्ण झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर पेरणीच्या कामांसाठी शेतकर्‍यांना उघडीपीची गरज होती. गेल्या आठ दिवसांपासून चांगली उघडीप मिळाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. पेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटण्यासाठी दमदार पावसाने पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारी चारपासून विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे निडगल सरकारी मराठी प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. यावेळी सुदैवाने विद्यार्थी दुसर्‍या खोलीत बसले होते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेत शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. वर्गखोल्यांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर देसाई यांनी केली आहे.

भाविकांची तारांबळ

खानापुरात मंगळवारपासून ग्रामदेवता मर्‍याम्मादेवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचा बुधवारी शेवटचा दिवस होता. या यात्रेत हमखास पावसाची हजेरी लागते. यावर्षीही त्यात खंड पडला नाही. यात्रेच्या प्रमुख दिवशी पावसाने हजेरी लावल्याने हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची एकच तारांबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT