बेळगाव : मोहरमनंतर कवडीपीर मिरवणूक काढली जाते. ती शुक्रवारी रात्री निघाली असातना नृत्य करताना एकाचा पाय दुसर्याला लागल्याचे निमित्त होऊन एका अल्पवयीन युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. त्यात तो युवक गंभीर जखमी असून, मार्केट पोलिसांनी तिघा अल्पवयीन युवकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहरमनंतर मुस्लिम समाजातील अल्पवयीन युवकांकडून कवडीपीर मिरवणूक काढली जाते. यामध्ये सर्व अल्पवयीन युवक सहभागी होत असल्याने याला ‘छोटा पीर’ असेही म्हटले जाते. शुक्रवारी रात्री ही मिरवणूक निघाली होती. डॉल्बी लावून युवक जल्लोष करत होते.
तथापि, मिरवणूक कसाई गल्लीत आली असता नृत्यावेळी एका युवकाचा पाय दुसर्या युवकाला लागला. यातून दोन युवकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी दुसर्या गटातील तिघांनी रेहान अस्लम मुजावर (वय 16, रा. न्यू गांधीनगर) या युवकावर तलवारीने हल्ला केला. त्याच्या डोकीत व पाठीत तलवारीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी व सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्यात संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मार्केटचे निरीक्षक महांतेश धामण्णवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व संशयित तिघा अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार तलवारही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. निरीक्षक धामण्णवर तपास करीत आहेत.