कारवार : अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेला हल्ला आणि मंगळूरमधील सुहास शेट्टी या हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ राज्य सनातन धर्म रक्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 7) आंदोलन करण्यात आले. शहरातून फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरातील कोडीबीर मंदिर परिसररातून निषेध फेरीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन फेरी काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. यावेळी नागराज नायक, बी. एस. पै., महेश हरिकंत्र, डॉ. गणेंद्र नायक यांनी निषेध व्यक्त केला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली. याविरोधात सर्व हिंदूनी एक होण्याची गरज आहे. राज्यात बेकायदेशीरपणे राहणार्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.
मंगळूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येचाही निषेध करण्यात आला. याबाबतची तपासणी एनआयए मार्फत करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. जिल्हाधिकार्यांच्या मार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फेरीत सुहास शेट्टी, प्रशांत पुजारी, कन्नय्या लाल, शिवू उप्पार आदींची छायाचित्रे आंदोलकांनी हातात घेतली होती. आंदोलनात हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे शहरातील औषध आणि दुधाची दुकाने वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मासळी मार्केटही बंद ठेवण्यात आले होते. हॉटेल बंद ठेवण्यात आल्याने बाहेरुन आलेल्या लोकांचे हाल झाले.