कारवार : पहाटे फिरावयास गेलेल्या माजी नगरसेवकाची अज्ञात मारेकर्यांनी चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना कारवारमधील बीएसएनएल कार्यालयाजवळ रविवारी (दि. 20) पहाटे घडली. सतीश कोळंबकर (वय 62) असे त्यांचे नाव असून संशयित हल्लेखोर फरारी झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, माजी नगरसेवक कोळंबकर नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले होते. बीएसएनएल कार्यालयाजवळ दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार करून तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
वैयक्तिक रागातून सतीश कोळंबकर यांचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत कोळंबकर यांच्यावर कारवारमधील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. राउडी शीटर यादीत त्यांचा समावेश होता. दहा दिवसांपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर आर्थिक व्यवहारातून हल्ला करण्यात आला होता. कारवार पोलिस अधिक तपास करत आहेत.