विजापूर : विजापूर शहरात मध्यरात्री एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्ताफ मनगुळी (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गांधीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यावर चोरीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी आरोप असल्याची माहिती आहे.
अल्ताफ मनगुळी काल रात्री जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार अल्ताफवर प्रथम चाकूने हल्ला करून त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यावर दगड घालून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. घटनास्थळी परिसरात रक्ताचे डाग आढळल्याचे सांगण्यात येत आहे. अल्ताफचा खून अनेकांनी मिळून केला असावा, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अल्ताफ मनगुळी हा पत्नी आणि मुलांसह विजापूर शहरातील मुझावर गल्ली परिसरात रहात होता. गांधीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर चोरीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी आरोप असल्याचे सांगण्यात येते. तो रोज रात्री मित्रांसोबत घराबाहेर जात असे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.