Murder  Pudhari
बेळगाव

Sankeshwar murder: संकेश्वर येथे तरुणाचा खून

दोघेजण ताब्यात : चाकूने भोसकत दगडाने ठेचून मारले

पुढारी वृत्तसेवा

संकेश्र्वर : संकेश्वर येथे तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. बाबू शंकर भूसगोळ (वय ३५, रा. संकेश्वर, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे.

अनैतिक संबंध व येण्या-जाण्याचा रस्ता बंद केल्याच्या रागातून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात स्पष्ट झाली आहे. ज्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, तिच्या पतीने मित्राला सोबत घेऊन हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी त्या दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, मृत बाबूचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय या महिलेच्या पतीला होता. शिवाय बाबूने येण्या-जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करत तो रस्ता बंद केला होता. त्याच्या या सातत्याच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणाने आपल्या मित्राला सोबत घेऊन हा खून केला.

रात्रीच्या वेळी बाबू घराबाहेर आला असता त्याला चाकूने भोसकले. त्यानंतर दगडाने डोके ठेचून खून केल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत संशयितांना जेरबंद करण्यात संकेश्वर पोलिसांना यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT