गोकाक : गोकाक नाका नंबर वन येथे बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या महिलेचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी मंगळसूत्र आणि दागिने लंपास केले. चोरट्यांचा धोका असल्याचे सांगून दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून दोघा चोरट्यांनी दागिने लांबविले. याप्रकरणी घटप्रभा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सुमारे दोन तोळे वजनाचे तीन लाख रूपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
याबाबत समजलेली माहिती अशी, गोकाक तालुक्यातील अरभावी येथील रत्नव्वा रुद्राप्पा करलिंग या शुक्रवारी रात्री गोकाक नाका नंबर वन येथे बसच्या प्रतीक्षेत थांबल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना कुठे जाणार असे विचारून आता बस नाही, असे सांगतिले. तसेच परिसरात चोरट्यांचा धोका असून अंगावरील दागिने पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रत्नव्वा यांनी दागिने पिशवीत ठेवले. त्यानंतर त्यांना दुचाकीवरून सोडतो, असे सांगतिले.
दरम्यान, त्या महिलेचे लक्ष विचलित करून दागिने असलेली पिशवी लंपास केली. त्यानंतर त्या महिलेस तुम्ही येथेच थांबा, दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून येतो, असे सांगून पसार झाले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते आले नाहीत. तसेच त्यांच्याकडील सोने ठेवलेली पिशवीही गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत रत्नव्वा यांनी घटप्रभा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.