बेळगाव : वाढते तापमान, कोरडे व उष्ण वारे यांसारखी परिस्थिती राज्यात विशेषतः जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम आणि पूर्व घाटात वणवे लागण्यासाठी अनुकूल असली तरी अशा घटनांना वेळीच आळा घातला जात आहे. राज्यात नोंदविलेले जवळपास 90 ते 95 टक्के वणवे वाढण्यापूर्वीच नियंत्रणात आणले गेले आहेत. परिणामी वणवा व्यवस्थापनात कर्नाटक एक राष्ट्रीय आदर्श म्हणून उदयास आले आहे.
राज्य वनखात्याच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2026 पासून वनक्षेत्र आणि बफर झोनमध्ये 9,000 हून अधिक वणव्याच्या सूचना नोंदविण्यात आल्या. मात्र, बहुतेक घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आल्याने त्यांचे मोठ्या आपत्तीत रुपांतर होण्यापासून रोखले गेले. या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर उपग्रह निरीक्षणावर आधारित मजबूत पूर्वसूचना व जलद-प्रतिसाद प्रणालीला दिले जाते.
फेब्रुवारी 2017 आणि 2019 मध्ये बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या विनाशकारी आगीनंतर पारंपरिक देखरेख प्रणालींऐवजी तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. या आगींमध्ये मिळून 12 हजार एकरहून अधिक जंगल जळून खाक झाले होते. एका वनरक्षकाचा बळी जाण्यासह अनेक अधिकारी जखमी झाले होते. या घटनेपासून बोध घेत वनखात्याने कर्नाटक राज्य रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या (केएसआरएसएसी) सहकार्याने स्वदेशी वणवा सूचना प्रणाली तयार केली. आता ही प्रणाली आगीच्या घटनांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
उपग्रहांनी टिपलेल्या वणव्यांवर हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरमध्ये तत्काळ प्रक्रिया केली जाते आणि केएसआरएसएसीद्वारे त्यांचे कार्यवाही करण्यायोग्य सूचनांमध्ये रुपांतर केले जाते. काही मिनिटांतच या सूचना आघाडीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत पोचविल्या जातात. या सूचनांमध्ये अचूक भौगोलिक स्थान, हवामानाचे मापदंड आणि जवळपासची महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश असतो. परिणामी पथकांना त्वरित तैनात करणे शक्य होते. या सूचना गस्ती पथकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एसएमएसद्वारे पाठविल्या जातात. आम्हाला आमच्या ‘1926’ या हेल्पलाइनद्वारे लोकांकडूनही सूचना मिळतात, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन संसाधन व्यवस्थापन) अनिलकुमार रतन यांनी सांगितले.
क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देणे आणि केलेल्या कारवाईच्या अहवालांसह छायाचित्रे एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करणे बंधनकारक आहे. जवळपास 60 टक्के धोक्याच्या सूचना बफर झोनमधील शेतांमधून येतात किंवा आग प्रतिबंधक रेषा तयार करण्यासाठी केलेल्या नियंत्रित जाळपोळीशी संबंधित असतात, असे त्यांनी सांगितले.