विजापूर : अमली पदार्थांविरोधात मोहीम तीव्र केलेल्या विजापूर पोलिसांनी बसवण बागेवाडी तालुक्यातील दिंडवार गावात मोठी कारवाई केली. येथील एका शेतातून एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा २०० किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
शिवशंकर शरणप्पा जीर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात तूर पिकाची पेरणी करून त्यामध्ये ५०० हून अधिक गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे १.१० कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. दिंडवार गावात गांजाची लागवड केल्याची माहिती बीट पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसासार छापा टाकूनर गांजाची लागवड उद्ध्वस्त करण्यात आली आणि गांजा जप्त करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. बसवण बागेवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत नंदरेड्डी आणि गुरूशांत दाश्याळ यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे निंबरगी यांनी सांगितले.
अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई
जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस खाते प्रयत्नशील आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठेवून कठोर कारवाई केली जात आहे. विजापूर जिल्ह्यात अमली पदार्थांची निर्मिती, विक्री किंवा वापरासंदर्भात नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास त्यांनी ती पोलिस विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि बक्षीसही दिले जाईल, असे आवाहन पोलिस प्रमुख निंबरगी यांनी केले आहे.