Karnataka Bhootnal Lake Incident 
बेळगाव

Karnataka Bhootnal Lake Incident: तलावात आढळले एकाच कुटुंबातील सहा मृतदेह

माता व पाच मुलांचा समावेश; विजापूरच्या भूतनाळ तलावातील घटना, कारण अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Karnataka Bhootnal Lake Incident

विजापूर : शहराबाहेरील ऐतिहासिक भूतनाळ तलावात एकाच कुटुंबातील सहाजणांचे मृतदेह आढळून आले आहे. मृतांमध्‍ये एका महिलेचा आणि तिच्‍या ५ मुलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ६ जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून त्‍यांच्‍या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विजापूर जिल्ह्यातील तोरवी गावातील शांतीनगर येथील शोभा मल्लिकार्जुन जालगेरी (वय ३५), विद्या जालगेरी (१५), सुवर्णा जालगेरी (१३), तिप्पराय जालगेरी (१२), सानिका जालगेरी (१०) आणि विकास जालगेरी (०६) अशी मृतांची नावे आहेत.

शोभा जालगेरी आणि त्यांचे पती मल्लिकार्जुन जालगेरी यांच्यात २३ ऑगस्टच्या रात्री श्रावण सोमवारच्या पूजेवरून तसेच स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर शोभा मुलांसह घरात झोपल्या. त्यांचे पती घराबाहेर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मल्‍लिकार्जुन यांना पत्नी आणि मुले घरात आढळून आले नाहीत. त्‍यांनी गावात आणि विजापूर शहरात त्यांचा शोध घेतला. श्रवणदोष असलेला तिप्‍पराय हा मुलगा विजापूर शहरातील शाळेत शिकत होता. त्‍यांनी शाळेत चौकशी केली असता त्याला त्याची आई घेऊन गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर २४ ऑगस्टला मल्लिकार्जुन यांनी विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात पत्नी व मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती.

बुधवारी सकाळी भुतनाळ तलावात ६ मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच डीवायएसपी नागराज, आदर्शनगर पोलिस ठाण्याचे पीएसआय सीताराम लमाणी, पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तलावातून बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी म्हणाले, बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजता भूतनाळ तलावात ६ जणांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. तपास केल्‍यानंतर मृतांची ओळख पटली. सदर महिलेने मोबाईल घरातच ठेवला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून मल्लिकार्जुन जालगेरी यांची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT