बेळगाव

Karnataka Crime : निडगलजवळील सिद्धेश्वर मंदिरात तोडफोड

ग्रामस्थांत संताप : पोलिसांकडून पाहणी, समाजकटंकाचे कृत्य असल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : निडगलचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ८) उघडकीस आली. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच गाभाऱ्यासमोरील तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आल्याने ग्रामस्थांसह भाविकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खानापूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर निडगलजवळ वसलेले सिद्धेश्वर मंदिर महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. दगडी शिळांपासून उभारलेल्या या प्राचीन मंदिराला जिल्ह्यासह खानापूर तालुक्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे, सध्या त्याची तयारी सुरु होती. अशावेळी मंदिरातील मूर्ती आणि धार्मिक प्रतीकांची तोडफोड झाल्याने लोकभावना दुखावल्या गेल्या आहेत.

घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने खानापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेमागे नेमका कुणाचा हात आहे, हा प्रकार केवळ समाजकंटकांचे कृत्य आहे की धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एल. एच. गवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रविवारी (दि. ९) ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मंदिर परिसरातील परिस्थितीची माहिती घेऊन संशयितां शोध सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT