विजापूर : कालवा कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी कृष्णा भाग्य जलनिगम (केबीजेएनएल) उपविभाग क्र. १ सालोटगी येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
विजापूर लोकायुक्त पोलिस ठाण्यात नानासाहेब रुडगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाने पूर्ण केलेल्या कालवा कामाच्या ३,७१,४१९ रकमेच्या बिलाच्या मंजुरीसाठी मोजमाप पुस्तिका तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता सेवुलाल चव्हाण यांनी १० हजार लाचेची मागणी केली होती. त्याच कामासाठी कनिष्ठ अभियंता सातलिंगप्पा रोडगी यांनी ८ हजार मागितल्याचा आरोप होता.
ही कारवाई विजापूर लोकायुक्तचे पोलिस अधिक्षक टी. मल्लेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक मल्लिकार्जुन एस. तुळसिगेरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक आनंद टक्कण्णावर, आनंद दोणी, निंगप्पा पुजेरी तसेच लोकायुक्त पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.