विजापूर : भरधाव ट्रकने गतिरोधकामुळे वेग कमी झालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दिलेल्या धडकेत वडील व मुलगी जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण जखमी झाले.
विजापूर जिल्ह्यातील निडगुंदीजवळील मुद्देबिहाळ क्रॉस परिसरात राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. २१) हा भीषण अपघात झाला. गिरीश लोधी (वय २५) व प्रियांका लोधी (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ऊस तोडणीच्या कामासाठी इंडीतील मजूर ट्रॅक्टरमधून मंड्याकडे जात होते. मुद्देबिहाळ क्रॉसजवळ गतिरोधक आल्याने ट्रॅक्टरचालकाने वेग कमी केला होता. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरमधील गिरीश व त्यांची मुलगी प्रियांका यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघा मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेची नोंद निडगुंदी पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.