गोकर्ण : वीकेंडच्या निमित्ताने सहलीसाठी बंगळूरहून गोकर्णला आलेल्या आयटी कर्मचाऱ्यांच्या गटापैकी तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून, दोघांना वाचवण्यात यश आले. मृतांमध्ये एक युवतीचा समावेश आहे. दुब्बनशशी समुद्र किनाऱ्यावर पाण्यात खेळत असताना हे पाचही जण मोठ्या लाटेत वाहून गेले. दोघांना जीवरक्षकांनी वाचवले. सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. शोभा दास (वय २२, झारखंड), मोहम्मद अक्रम आणि विश्र्वा (रा. बंगळूर) अशी मृतांची नावे आहेत. निशांत आणि मोहम्मद कासीम यांना वाचवण्यात यश आले आहे.
बंगळूरच्या बेल्लंदूर येथील अलोरिया इकोस्पेस कंपनीचे १६ कर्मचारी सहलीसाठी शनिवारी गोकर्णला आले होते. ते येथील दुब्बनशशी समुद्रकिनाऱ्यावरील कोजे रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यांच्यापैकी काहीजण समुद्रात खेळण्यासाठी पाण्यात गेले होते. अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेत पाचजण वाहून गेले. रिसॉर्टच्या जीवरक्षकांनी व स्थानिक मच्छीमारांनी चौघांना किनाऱ्यावर आणले. मात्र शोभाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर गटाचा प्रमुख मोहम्मद अक्रम याला पुढील उपचारांसाठी मणिपाल रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. निशांत व मोहम्मद कासिम यांना जीवरक्षकांनी वाचवले असून, उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे.
गोकर्ण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह कारवार मेडिकल कॉलेजच्या शवागारात हलविले. अपघातानंतर पोलिसांनी रिसॉर्ट व होमस्टे मालकांना येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क केले आहे.