बेळगाव

Karnataka Sugarcane Cutting Workers: गळीत हंगाम लांबल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ

उसाच्या दराचा तिढा अद्याप न सुटल्याने साखर कारखाने सुरू होण्यास विलंब

पुढारी वृत्तसेवा

अंकली : यंदाच्या ऊस गळीत हंगामात उसाला योग्य दर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पण उसाच्या दराचा तिढा अद्याप न सुटल्याने साखर कारखाने सुरू होण्यास विलंब होत आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच ऊस तोडणी मजुरांनाही बसत आहे. कारखाने सुरू होऊन ऊस तोडणी कधी सुरू होणार, या प्रतीक्षेत महाराष्ट्रासह विविध भागांतून कुटुंबीयांसह दाखल झालेल्या ऊस तोडणी मजुरांचे लक्ष लागून राहिले आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ऊस गळीत हंगामाच्या काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या कुटुंबीयांसह ट्रॅक्टर आणि इतर वाहनांतून सीमाभागातील साखर कारखान्यांच्या परिसरात दाखल होतात. कारखान्यांकडून तोडणीचे आदेश मिळाल्यानंतर शेताच्या बाजूला तात्पुरते पाल ठोकून हे मजूर ऊस तोडणीचे काम सुरू करतात. तोडलेल्या उसाच्या प्रतिटनावर मिळणारी मजुरी हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असतो.

यंदा ऊस दराच्या वादामुळे गळीत हंगाम लांबल्याने हाताला काम नाही. शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने गळीत हंगाम सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. 1 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करावेत, उसाच्या वजनातील पारदर्शकतेसाठी प्रत्येक कारखान्यात वजनकाटा असावा, साखरेचा उतारा तपासण्यासाठी प्रयोगशाळेची व्यवस्था करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

एकीकडे कारखाने सुरू होण्यास विलंब होत असल्याने ऊस तोडणी रखडली आहे. दुसरीकडे पावसाचा अभाव आणि पाणीटंचाईमुळे शेतातील उभे ऊस पीक वाळण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत असून तोडणीला विलंब झाल्यास वर्षभर केलेली मेहनत आणि शेतीवर केलेला खर्च वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

लवकरच कारखाने सुरू होतील आणि ऊस तोडणीच्या कामातून कमाई करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, या अपेक्षेने आलेल्या मजुरांचे दिवस प्रतीक्षेत जात आहेत. प्रवास आणि राहण्याच्या खर्चासाठी उसनवारी करून आणलेले पैसेही संपत चालले आहेत. त्यामुळे अन्नधान्य, दैनंदिन गरजा आणि मुलांच्या संगोपनाचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. उसाच्या दरावरून सुरू असलेल्या संघर्षावर शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांनी चर्चेतून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT