जमखंडी, अंकली : लोकायुक्त पोलिसांनी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. बुधवारी जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील केरूर पोलिस ठाण्यावर टाकलेल्या छाप्यात लाच घेताना एक उपनिरीक्षक आणि एक हवालदार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उपनिरीक्षक भीमप्पा रबकवी आणि हवालदार संतोष बिरादार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
एका आरोपीला प्रकरणातून वगळणे आणि त्याची दुचाकीसोडण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. जुगार प्रकरणात पकडलेल्या एका व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने अधिकाऱ्यांनी सुमारे 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत मुथप्पा नायकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे कारवाईची योजना आखणाऱ्या लोकायुक्त पथकाने फोनकॉलच्या रेकॉर्डिंगसह पुरावे गोळा केले. त्यानंतर 1.70 लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली.
लोकायुक्त एसपी महालिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी सुरेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.