बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने अनुसूचित जाती-जमाती आणि पंचमसाली लिंगायत समाजाचीही अनेक वर्षांपासूनची आरक्षणाची मागणी पूर्ण केली आहे. या समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2 बी अंतर्गत मुस्लिमांना दिलेले आरक्षण रद्द करून त्यांना आर्थिकद़ृष्ट्या मागास वर्गात आरक्षण दिले जाईल. पंचमसाली लिंगायत आणि वक्कलिग समुदायाने 2 सी श्रेणी अंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे. ती पूर्ण करण्यासाठी 2 सी अंतर्गत वक्कलिगांना 6 टक्के आणि 2 डी अंतर्गत लिंगायतांना 7 टक्के आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मंत्रिमंडळाने अनुसूचित जाती-जमातींना अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे लोकसंख्येनुसार चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. गट 1 मध्ये आदिजांबव समाजाला 6 टक्के, गट 2 मध्ये आदिकर्नाटक समाजाला 5.5 टक्के, गट 3 मध्ये बंजारा, भोवी, कोराचारी यांना 4.5 टक्के आरक्षण आणि गट 4 मध्ये 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.