बेळगाव

Karnataka Drowning Incident: सेल्फीच्या नादात कुटुंबातील चौघांचा मृत्यू

एकीला वाचवताना कावेरीच्या पात्रात एकूण ५ ठार

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कावेरी नदीच्या काठावर सेल्फी घेत असताना एक महिला पाय घसरून नदीत पडल्यानंतर तिला वाचवताना एकूण पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी चार महिला एकाच कुटुंबातील असून, पाचवा मृत कारचालक आहे. मुत्तती (जि. मंड्या, ता. मळवळ्ळी) येथे बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.

विजयम्मा (वय ५०), श्वेता (३८), प्रियंका (२८), चैत्रा (२०) आणि कारचालक महेश (सर्व रा. ब्याडरहळ्ळी, जि. रामनगर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कनकपूर येथील त्यांच्या नातेवाईकांनी आयोजित केलेल्या एका जेवणावळीला आले होते. जेवणावळी आटोपून ते सर्वजण मुत्तती येथील अंजनेय देवस्थानला कारमधून गेले होते.

दर्शन घेतल्यानंतर विजयम्मा कावेरी नदीकाठी उभी राहून आपल्या मोबाईल फोनवर सेल्फी काढत असताना त्यांचा अचानक पाय घसरला व त्या थेट पाण्यात पडल्या. त्यांची मुलगी प्रियंका हिने विजयम्मा यांना वाचविण्यासाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागल्या. त्या दोघींना वाचवण्यासाठी इतर दोघीही पाण्यात उतरल्या.

मात्र, त्या चौघींनाही पोहता येत नसल्यामुळे त्या बुडू लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा कारचालक महेश याने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याच्या प्रवाहात घाबरलेल्या महिलांनी त्याला घट्ट पकडले. त्यामुळे त्यालाही काही करता न आल्याने तोही त्यांच्यासोबत पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला.

घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ त्यांनी शोधकार्य सुरू केले. काही काळानंतर पाचही मृतदेह सापडले. ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT