बंगळूर : केंद्र सरकारकडून हिंदी भाषेच्या वापराबाबत सक्ती केली जात आहे. पण, ही सक्ती कधीच मान्य करणार नाही. राज्यामध्ये द्विभाषा धोरण जारी आहे. कन्नड आणि इंग्रजी अशा त्या भाषा आहेत. त्रिभाषा धोरण नाही. कन्नड कुणाला येत नसेल तर त्यांना शिकवले जाईल. केवळ दुचाकी कारला धडकल्याच्या कारणावरुन भाषिक वाद निर्माण केला जात असल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मंड्या जिल्ह्यातील हिंडिगनविले (ता. नागमंगला) येथील यात्रेनिमित्त ते गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिकावर विंग कमांडरने हल्ला केला. आता यामध्ये भाषावाद उकरुन काढला जात आहे. केंद्र सरकारने हिंदीची सक्ती टाळावी. कर्नाटक हिंदी सक्ती कधीच मान्य करणार नाही. कर्नाटकातील प्रत्येकाने कन्नड शिकणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
चूक कुणाचीही असली तरी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना दिली आहे. विंग कमांडर असो की इतर अधिकारी असो. कारवाईला सामोरे जाणे अनिवार्य असेल. सदर घटनेनंतर शिलादित्य बोस यांनी कन्नडिग विकासकुमारविरुद्ध विनाकारण आरोप केले आहेत. कन्नड भाषेवरुन त्यांनी केलेले आरोप योग्य नाहीत.
कर्नाटकातील कन्नडिग भाषेचा वाद उकरुन काढणार नाहीत. तेवढ्या खालच्या पातळीवर ते जात नाहीत. कन्नडीग असल्याचा अभिमान त्यांना असला तरी दुराभिमान नाही. कुणालाही कमी लेखणारी वृत्ती कन्नडिगांमध्ये नसल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी घटनेतील सत्यतेची पडताळणी करावी. कुणीही केलेला आधारहीन आरोप उचलून धरु नये. यामुळे प्रत्येक कन्नडिग दुखावला जाईल. कन्नडिगांनी कायदा हातात घेण्याचे काम करु नये. घटनेमध्ये कुणाचीही चूक असो, व्यक्ती कितीही मोठी असो त्याविरुद्ध चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
विंग कमांडर शिलादित्य बोस हे पत्नी स्क्वॉड्रन लिडर मधुमिता बोस यांच्यासह विमानतळाच्या दिशेने कारने जात होते. त्यावेळी मोटारसायकलस्वार त्यांच्या कारसमोर आला. त्याने कारवर लिहिलेले डीआरडीओ ही अक्षरे पाहिली आणि कन्नडमध्ये शिवीगाळ केली. शिलादित्य कारमधून बाहेर आले त्यावेळी मोटारसायकलस्वाराने त्यांच्यावर हात उगारला. यामध्ये त्यांच्या चेहर्यावर जखम झाली. ते रक्तबंबाळ झाले असे सांगून शिलादित्य यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.
त्याचवेळी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून मोटारसायकलस्वार विकास कुमारला शिलादित्य यांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे. त्यांची पत्नी त्यांना आवरताना दिसत आहे. घटनास्थळी सुमारे चार सीसीटीव्ही कॅमेरे असून सर्व बाजूंनी घटनेची माहिती मिळवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. बायप्पनहळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.