बेळगाव : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्टंटबाजी सुरु आहे. राज्यात काँग्रेस काळात भ्रष्टाचाराचे पेव वाढले आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे एआयसीसी अध्यक्ष असूनही, राज्य काँग्रेस नेतृत्वातील गोंधळ दूर करण्यात अपयशी ठरले आहेत. सत्तेवरुन राज्य सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ तीन दिवसांत दूर झाला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केली.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना खासदार म्हणाले, राज्याची प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकार शेतकर्यांच्या संघर्षांना प्रतिसाद देत नाही. बेळगावमध्ये राज्य सरकाकडून विकासकामे राबवण्यासाठी मागितलेला निधी सरकारने रोखला आहे.
केंद्र सरकारने बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी 927 कोटी रुपये निधी जारी केला आहे. मात्र, सहा वर्षे उलटूनही राज्य सरकारने अद्याप शेतकर्यांना जमीनीची भरपाई दिलेली नाही. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या 406 एकर जमिनीच्या भरपाईसाठी 149 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करूनही राज्य सरकारने अनुदान दिले नाही, अशी टीका खासदारांनी केली.
केंद्रीय गृहनिर्माण अंतर्गत प्रकल्प राबवण्यासाठी बेळगाव शहराची निवड करण्यात आली होती. घनकचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पासाठी 135 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु हा प्रकल्पही रखडला आहे. याशिवाय, अमृत योजनेअंतर्गत बेळगाव तालुक्यातील हलगा गावात 70 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकामही रखडल्याची टीका शेट्टर यांनी केली.पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, शहरीध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.