Rakaskop Reservoir 
बेळगाव

Rakaskop Reservoir: राकसकोपच्या पाणीपातळीत १३ फुटांनी वाढ

गत आठ दिवसांतील बदल : तुडुंब होण्यासाठी आणखी १६ फुटांची गरज

पुढारी वृत्तसेवा

राकसकोप : जुलैच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत पाणीपातळी १३ फुटांनी वाढली आहे. गुरुवारी (दि. ९) जलाशयात पातळी २,४५८.८० फूट पाणी होते. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी २,४७४ फूट होती. जलाशय तुडुंब होण्यासाठी आणखी १६ फूट पाण्याची गरज आहे.

जलाशय परिसरात आतापर्यंत एकूण ९३८.५ मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी पहाटे संपलेल्या चोवीस तासांत ९२.५ मिमी पावसाची नोंद झाली. सतत दहा दिवस झालेल्या पावसामुळे जलाशय परिसरातील नाले प्रवाहीत झाल्याने मृत साठ्यांपेक्षा कमी पातळी गाठलेल्या राकसकोप जलाशयात १३ फूट पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे, पाणीपातळी २,४५९ फुटांपर्यंत पोचली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जलाशयात ११ फूट कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यात जलाशय तीनवेळा तुडुंब झाले होते. यंदा हे जलाशय भरण्यासाठी १६ फूट पाण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यक्ता आहे. मात्र, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलाशय भरण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाला एक महिना उशीर झाल्याने राकसकोप जलाशयाने तळ गाठला होता. मृतसाठ्यातून पाणीउपसा करण्याची वेळ आली होती. त्यामुळे, शहरात १२ दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागला. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसाने १३ फूट पाणीसाठा जमा झाला आहे. जलाशय तुडुंब होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, अशी माहिती एलअँडटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT