बेळगाव : बेळगावातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी शनिवारी (दि. 1) सरकारी मदतीच्या जोरावर राज्योत्सव मिरवणूक काढण्यात आली. मात्र, या मिरवणुकीत धिंगाणा घालण्यासाठी महाराष्ट्रातून मागविलेल्या डीजेचा वापर केला. एवढेच नाही तर इतरवेळी मराठीचा दुस्वास करणाऱ्या कन्नडिगांनी थिरकण्यासाठी मराठी व इंग्रजी गाण्यांचा आधार घेतला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या डीजेच्या दणदणाटामुळे शहरवासीयांचे कान विटले होते.
कोल्हापूर व अन्य ठिकाणांहून मागविलेले 16 हून अधिक डीजे शुक्रवारी (दि. 31) रात्रीपासूनच शहरात दाखल झाले होते. शनिवारी सर्व नियम धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट करण्यात आला. साधारणपणे 60 ते 85 डेसिबल आवाज सुरक्षित मानला. 90 डेसिबलचा आवाज एखादी व्यक्ती आठ तास सहन करु शकते. पण, 115 डेसिबलचा आवाज 25 मिनिटांवर ऐकू शकत नाही. 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. मात्र, या मिरवणुकीत आवाज मर्यादेचे सर्व नियम मोडण्यात आले होते. आवाजाचे मोजमाप करणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ भूमिगत झाले होते. सरकारी कार्यक्रम असल्याने पोलिसांनीही या दणदणाटाकडे दुर्लक्ष केले.
गणेश विसर्जन व शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डीजे लावण्यावर व त्याच्या आवाजावर पोलिस निर्बंध घालतात. दोन टॉप, दोन बेसला परवानगी दिली जाते. त्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाते. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीत लावण्यात येणाऱ्या डीजेवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे, कन्नड संघटनांनी डीजेचा दणदणाट करुन शहरवासियांचे जगणे मुश्किल करुन ठेवले होते. या आवाजाला कंटाळून अनेकांनीं घराला कुलूप लावून बाहेर जाणे पसंत केले.