बंगळूर : माजी पंतप्रधान व निजद नेते एच. डी. देवेगौडा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील चार राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागांसाठी निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. पहिली अधिसूचना १ जून रोजी जारी करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
कर्नाटकसह देशातील विविध राज्यांमधील एकूण २४ राज्यसभा जागांचे निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ११ जून आहे. १८ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बेळगावचे भाजप नेते इराण्णा कडाडी व मंगळूरमधील भाजपचे नेते के. नारायण यांच्या सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. एकूण २४ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.