Dr. G Parameshwara  
बेळगाव

Dr. G Parameshwara | दुष्काळाला तोंड देण्याची तयारी करा : उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर

पीक परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सुपर अल निनोमुळे यंदा उद्‌भवणाऱ्या संभाव्य दुष्काळाला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते गुरुवारी (दि. २५) राज्यातील पिकांची परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत बोलत होते.

ते म्हणाले, राज्यावर गंभीर परिणाम करण्याची शक्यता असलेल्या एल निनोमुळे तीव्र दुष्काळ उद्‌भभवू शकतो. केंद्रीय हवामान विभागासह अनेक शास्त्रज्ञांनी यावेळी एल निनोच्या परिणामांबद्दल इशारा दिला आहे. हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पावसाची कमतरता, पिण्याचे पाणी व चारा, राज्यात होणारे संभाव्य परिणाम, लोकांना भेडसावणाऱ्या समस्या व राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळाची शक्यता यावर सविस्तर चर्चा केली.

तसेच भविष्यात उद्‌भवू शकणाऱ्या सर्व समस्यांना थोपवून लावण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा, कृषी कार्यांचे व्यवस्थापन व जलसंधारण या संदर्भात जिल्हावार कृती आराखडे तयार करावेत. जलाशयांमधील पाणी पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवून जलस्रोतांमधून होणारी गळती रोखण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.

जलाशयांमधील पाण्याची पातळी, भूजल स्थिती व पाण्याचा वापर यावर सातत्याने लक्ष ठेवले जावे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ उद्भवल्यास संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून तातडीने कारवाई करावी, जेणेकरुन जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही. याची काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदण्याची परवानगी तातडीने देण्यात यावी. या कामात कोणताही विलंब होता कामा नये. हे काम ग्रामीण विकास व पंचायत राज विभागांच्या समन्वयानेच केले जावे, असे आदेशही डॉ. परमेश्वर यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT