हुबळी : हुबळी-धारवाड पोलिसांनी पोस्को प्रकरणाच्या तपासादरम्यान बालतस्करीचे धक्कादायक रॅकेट उघडकीस आणत तीन जणांना अटक केली आहे. अल्पवयीन पीडित मुलगी दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असता, तिच्या पहिल्या अपत्याची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या प्रकरणी अब्दुल करीम सौदागर, झियाउल नसावले आणि मंजुनाथ सुरंगेकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळूर येथे शोधमोहीम राबवून सुमारे तीन महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका केली. तपासादरम्यान पोलिसांनी पीडित मुलीच्या पहिल्या अपत्याबाबत चौकशी केली असता, कुटुंबीयांनी उपचारासाठी मूल बाहेरगावी असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक व अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू ठेवला. त्यातून मध्यस्थामार्फत बाळाची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अब्दुल करीम सौदागर याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. झियाउल नसावले याने बाळाच्या विक्रीत मध्यस्थाची भूमिका बजावली, तर मंजुनाथ सुरंगेकर याने ते बाळ विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन गर्भवती मुलीची माहिती मिळाल्यानंतर मध्यस्थाने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधून बाळ जन्माला घालण्यास आणि नंतर त्याची विक्री करण्यास प्रवृत्त केले. यासाठी प्रसूतीसह सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आश्वासन देत हा व्यवहार घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाळाच्या विक्रीची नेमकी तारीख अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी सुटका करण्यात आलेले बाळ सुमारे तीन महिन्यांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामागे आणखी मोठे बालतस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास सुरू असून, आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का याचाही शोध पोलिस घेत आहेत.