बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा या ना त्या कारणाने सातत्याने होताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार शुक्रवारी दिल्लीला जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी ‘प्रयत्न अयशस्वी झाले असतील; पण प्रार्थना नाही’ अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित केला असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची तयारी व केंद्राच्या व्हीबी जीरामजी योजनेविरुद्धच्या आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर हायकमांडशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला जाणार असून यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिली. गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, आसाम विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत पक्षाची बैठक आहे. मी निवडणूक निरीक्षक असून उद्याच्या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहणार आहे. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. त्यांना भेटून विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. मी केपीसीसी अध्यक्ष असल्याने मला राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना भेटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यावर वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्रयत्न अयशस्वी झाला, तरी प्रार्थना अयशस्वी होणार नाही. या माझ्या संदेशाचा अनेकांनी वेगवेगळा अर्थ लावला आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कारण कावेरी पाणीवाटपासंदर्भात न्यायालयाकडून आपल्याला एक उपाय मिळाला आहे. त्यामुळे मी तो संदेश दिला होता, असेही शिवकुमार म्हणाले.