बंगळूर : एकीकडे दिवाळी सण तोंडावर आला आहे, तर दुसरीकडे राज्य काँग्रेसमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या स्टिंग ऑपरेशनसह विविध विषयांवर काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद दिल्लीला रवाना झाले आहेत. एसआयआरविरोधातील आंदोलनाबाबतही चर्चा होणार आहे.
दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा आपला उद्देश आहे. तसेच या भेटीदरम्यान अनेक विषयांवर स्वाभाविकपणे चर्चा होणार आहे. कोणत्या विषयावर चर्चा होईल, हे आताच निश्चितपणे सांगता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आपला विचार असून, त्याबाबत चर्चा नक्कीच होईल.
महामंडळ अध्यक्ष नियुक्त्या
महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी पक्षातील कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत आहे. या विषयावर केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी यापूर्वीच हायकमांडकडे मागणी केली आहे. सध्या महामंडळांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. सरकारचा कार्यकाळ आता केवळ दीड वर्ष शिल्लक असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी भूमिका हरिप्रसाद यांनी मांडली आहे.
पक्षाचे राज्य प्रभारी नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी महामंडळांच्या अध्यक्षपदांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असल्याचे समजते. ही यादी पुन्हा एकदा तपासून त्यानंतर मंजुरीसाठी पक्षश्रेष्ठींकडे सादर होणार आहे.
विधान परिषद नियुक्त्या
विधान परिषदेच्या पाच जागांवरील नामनियुक्तीचा विषयही चर्चेला येणार आहे. प्रामुख्याने चित्रपट अभिनेते रविचंद्रन, माजी आमदार रमेश बाबू तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते चिंकोड, आराध्या व बालराज यांच्या नावांची चर्चा आहे.