बंगळूर : मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ आमदार टी. बी. जयचंद्र यांनी समविचारी आमदारांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. ६) त्यांच्या निवासस्थानी समविचारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अनेक इच्छुकांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. यामुळे टी. बी. जयचंद्र यांच्यासह अनेकजण नाराज आहेत. त्यांच्याकडून स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला एन. वाय. गोपाळकृष्ण, आर. व्ही. देशपांडे, अप्पाजी नाडगौडा, दिनेश गुंडुराव, एच. पी. महादेवप्पा, शिवानंद पाटील, तन्वीर सेठ, हंपनगौडा बदरली, एस. आर. श्रीनिवास, बसवराज शिवण्णावर, एन. ए. हॅरिस, रहीम खान, एस. एन. नारायणस्वामी, प्रसाद आबय्या, पी. एम. अशोक, ए. आर. कृष्णमूर्ती, के. एन. राजण्णा, राघवेंद्र हिटनाळ, के. षडाक्षरी, डॉ. एम. सी. सुधाकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन या आमदारांनी दिले आहे. बैठकीमध्ये सर्व आमदार मिळून हायकमांडवर दबाव आणण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वतीने मंत्री चेलुवरायस्वामी, बाळकृष्ण आणि नरेंद्रस्वामी यांनी आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आमदारांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षाच्या बाजूला स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करावी, यासाठी ते विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या जयचंद्र यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिले होते. त्याचप्रमाणे एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांना ग्वाही दिली होती; परंतु त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही. त्यांना मंत्रिपद न देण्याचे कारणही सांगितले गेले नाही. यामुळे ते नाराज असून त्यामुळे त्यांनी विधानसभेत स्वतंत्र जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक नाराज आमदारांना सोबत घेऊन समविचारी गट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.