बंगळूर : कर्नाटकातील सत्ता हस्तांतरणाबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या तीव्र हालचाली आणखी गतिमान होत आहेत. येत्या 27 डिसेंबररोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह प्रमुख नेते नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.
आगामी केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत रणनीती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी कार्यकारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलणाऱ्या केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी आणि मतदानातील गैरप्रकारांविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठीही बैठकीत जोरदार चर्चा होणार आहे. बैठकीत कर्नाटकातील घडामोडींवर स्वतंत्र चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हाय कमांडचा निर्णय
प्रदेश काँग्रेसमधील संकट हे राज्यातील नेत्यांनी निर्माण केलेले संकट आहे. त्यांनी त्यावर स्वतःच तोडगा काढावा, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितल्यानंतरही, मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, या प्रकरणावरील हायकमांडचा निर्णय अंतिम आहे. म्हैसूरमध्ये खर्गे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, नेतृत्व बदलाचा मुद्दा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ठरवावा. ते जे काही निर्णय घेतील, त्याला आम्ही बांधील आहोत.
गोंधळ नको...
गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर म्हणाले, सत्ताधारी पक्षामध्ये कोणताही गोंधळ नसावा. गोंधळ झाला तर त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर होईल. म्हणून आपल्याला तो सोडवण्याची गरज आहे. राज्य काँग्रेसच्या गोंधळाबाबत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काय म्हणायचे होते, ते मला माहीत नाही; मात्र आपण गोंधळ दूर करून पुढे जावे, असे सर्वांचे मत आहे.