बेळगाव

Karnataka Police: कर्नाटकी पोलिसांना न्‍यायालयाचा दणका

रामदास कदम, बानुगडे-पाटील निर्दोष : महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण खटला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव, खानापूर : कर्नाटक विधिमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची खानापूरमधील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी (दि. ११) निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाहीत.

शिवसेना नेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३ (अ) अंतर्गत खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन निरीक्षक जी. आर. पाटील यांनी ही कारवाई केली होती.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात भाषण करताना कदम आणि बानुगडे-पाटील यांनी कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या भाषणामुळे परिसरातील वातावरण चिघळले आणि त्यानंतर खानापूर तसेच परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्याचा आरोपही पोलिसांनी केला होता. भगव्याकडे कुणीही वक्रदृष्टीने पाहत असेल, तर त्याचे डोळे काढा आणि भगव्याला हात लावत असेल तर हात काढा, अशा आशयाचे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप दोन्ही नेत्यांवर करण्यात आला होता. तसेच, तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या विरोधातही कदम यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी खानापूर न्यायालयात झाली. मात्र, सरकारी पक्षाला संशयितांवरील आरोप न्यायालयात ठोसपणे सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने संहितेच्या कलम २४८ (१) अंतर्गत रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची कलम १५३ व १५३ (अ) मधील आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. दोन्ही नेत्यांच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचन्नावर, अ‍ॅड. जोतिबा पाटील, अ‍ॅड. विशाल चौगुले, अ‍ॅड. महेश मजुकर आणि अ‍ॅड. सौरवसिंह पाटील यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT