Belgaum Police Officers Awarded
निपाणी : केंद्रीय गृह खात्याच्यावतीने देशभरात विविध पदावर कार्यरत असलेल्या व विशेष कामगिरी केलेल्या १५०० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. यामध्ये कर्नाटक राज्यातील एकूण पाच अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पदकाचे लवकरच बंगळूर येथे राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार आहे.
दरवर्षी केंद्रीय गृह खात्याच्यावतीने हे पदक जाहीर केले जाते.त्यानुसार २०२५ या सालात आपल्या पदावर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर गुन्ह्यांची उकल करून चांगली कामगिरी केल्याने केंद्रीय गृह खात्याच्यावतीने अशा अधिकाऱ्यांना विशेष पदकाने गौरवले जाते.
त्यानुसार राज्यातील बंगळूर येथील एसीपी एम. के. थम्मया, डीवायएसपी प्रकाश राठोड, सीपीआय रमेश छायागोळ तर बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातील सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी व मुडलगीचे सीपीआय श्रीशैल ब्याकुड यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे जाहीर झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील पदकाचे मानकरी कल्याणशेट्टी व ब्याकुड यांनी गंभीर गुन्ह्यांची वेळीच उकल केल्याने त्याच्या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारच्या गृहखात्याकरवी केंद्रीय गृहखात्याकडे पाठवला होता. त्यानुसार कल्याणशेट्टी व ब्याकुड यांना हे विशेष पदक जाहीर झाले आहे. सीपीआय कल्याणशेट्टी यांचे मुळगाव जमखंडी असून त्यांची आतापर्यंत पोलीस खात्यात २० वर्षे सेवा झाली आहे. त्यांच्यासह ब्याकुड यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.