Karnataka Accident Pudhari
बेळगाव

Karnataka Accident: ओव्हरलोड टिप्पर उलटून चालक ठार; सात जखमी

जगलबेटजवळ अपघात : उलटण्यापूर्वी तीन वाहनांना धडक

पुढारी वृत्तसेवा

रामनगर : नियंत्रण सुटलेला डस्टवाहू ओव्हरलोड टिप्पर तीन वाहनांना धडकल्यानंतर उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. तर सातजण गंभीर जखमी झाले. रामनगर-कारवार मार्गावर जगलबेटजवळ बुधवारी (दि. १०) दुपारी हा अपघात झाला.

चालक बाबू (रा. कुमटा) असे मृताचे नाव आहे. दुचाकीस्वार कृष्णा उत्तकले (ता. खानापूर), संतोष जाधव (वय ५५, रा. धारवाड), जयदीप रॉय (२७), संकेत रॉय (२२, दोघेही रा. कोलकाता), व्यंकटेश गौडा (३९), प्रकाश सुनगद (५४) आणि भारत नांदवडेकर (५३, तिघेही रा. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. रामनगरमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी काहींना हुबळी व बेळगावला हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जगलबेटमधील कृष्णा मंदिराजवळील धोकादायक वळणावर खडीची डस्ट घेऊन जाणारा भरधाव टिप्पर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला. आधी त्याने एका कारला, त्यानंतर बोलेरो आणि दुचाकीला धडक दिली. त्यानंतर तो रस्त्यावर उलटला. त्याच चालक बाबू जागीच ठार झाला. तर वरील सातजण गंभीर जखमी झाले. जयदीप रॉय आणि संकेत रॉय कामानिमित्त बाडगुंद येथे आले होते. तर व्यंकटेश गौडा, प्रकाश सुनगद आणि भारत नांदवडेकर केशव सिमेंट कंपनीच्या कामासाठी आले होते. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तोपर्यंत काही काळ या मार्गावर रहदारी कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान रामनगर-कारवार मार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड खडी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT