विजापूर : नंदी साखर कारखान्यात ऊस वजनाच्या बनावट नोंदी करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या घोटाळ्याचा बबलेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली असून ११.३२ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
याप्रकरणी १२ जून २०२६ रोजी बबलेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अशोक संगप्पा टिप्पारेड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याच्या ऊस वजन विभागातील धरेप्पा दुंडप्पा नावी व इतरांनी संगनमत करून २०२०-२१ ते २०२५-२६ या ६ गाळप हंगामावेळी बनावट टोकन व बोगस बिले तयार करून शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामनगौडा हत्ती व ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी टी. एस. सुल्फी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेश अवजी यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने कारखान्यातील ऊस वजन केंद्राच्या नोंदींची सखोल तपासणी केली. तपासावेळी संशयितांनी वजनमापन यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बनावट टोकन तयार करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वजनाशी त्यांची सांगड घालत बोगस बिले तयार केल्याचे उघड झाले आहे.
संशयितांनी २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत सुमारे ३४,४९०.६९९ टन उसाचे वजन कृत्रिमरित्या वाढवून दाखवत ९१ विविध बँक खात्यांमध्ये एकूण १२ कोटी ३३ लाख २२ हजार ७९३ रक्कम वर्ग करून अपहार केल्याचे स्पष्ट झाले. मुख्य संशयित धरेप्पा दुंडप्पा नावी याच्याकडून २१ लाखांची रक्कम, त्याच्या बँक खात्यातील ४ कोटी ८० लाख ४७ हजार ९८१ तसेच इतर बँक खात्यांमधील ५ कोटी ४८ लाख ५२ हजार १०२ अशी एकूण १० कोटी ५० लाख ८३ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिवाय विविध बँक खात्यांतील ८२ लाख ७ हजार ५६९ रक्कम गोठविण्यात आली असून एकूण ११ कोटी ३२ लाख ७ हजार ५६९ रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणी धरेप्पा दुंडप्पा नावी याच्यासह भीरप्पा गाडदार, यल्लप्पा गाडदार, प्रकाश गड्डी, परमानंद गड्डी, महादेव कांबळे (सिंगे), बाळप्पा चोपडे आणि प्रभाकर सिंगे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. अल्पावधीत कोट्यवधी रुपयांच्या या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना अटक करणाऱ्या विशेष तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे जिल्हा पोलिस विभागाने कौतुक केले असून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे