बंगळूर : स्वयंपाकघरात जेवणाच्या चवीवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हत्याकांडात झाले असून, संतापलेल्या तरुणाने आपली आई, आजी आणि काकाची धारदार शस्त्राने हत्या केली व त्यानंतर जीवन संपवले आहे. शनिवारी बंगळूर येथील कोटिगेपाळ्या परिसरात हे हत्याकांड घडले आहे.
प्रशांत (वय ३४) असे हल्लेखोराचे नाव असून, त्याची आई मंगलम्मा (वय ५५), वडिलांची आई (आजी) नंजम्मा आणि काका सतीश (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत अविवाहित होता. त्याचे वडील बाहेर गेले असताना शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रशांत आई-वडिलांसह आजी व काकांसोबत राहात होता. आई मंगलम्मा या कपड्यांच्या कारखान्यात काम करत होत्या. तर आजी पालिकेत कर्मचारी होती. त्याचे काकाही अविवाहित असून ते नळजोडणीचे काम करत होते.
शनिवारी सकाळी स्वयंपाकावरून प्रशांतचा आईशी वाद झाला. या वादात संतापलेल्या प्रशांतने आधी आईवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तिच्या किंकाळ्या ऐकून आजी स्वयंपाकघराकडे धावली असता तिलाही प्रशांतने भोसकले. त्यांच्या मदतीसाठी काका गेल्यानंतर त्यांनाही प्रशांतने भोसकून ठार केले.
कुटुंबीयांच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. त्यामुळे शेजाऱ्यांनी प्रशांतला पकडून एका खोलीत कोंडून ठेवले. मात्र त्याने त्याच खोलीत आत्महत्या केली. प्रशांत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती बंगळूर पश्चिम विभागाचे डीसीपी यतीश एन. यांनी दिली.
आईशी आधीपासून वाद, पण...
प्रशांतचे वडील चिक्कन्ना घरी परतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, प्रशांत हा चालक म्हणून कार्यरत होता. त्याचे पूर्वीपासून आईसोबत किरकोळ वाद होत होते. रात्री जेवण करून व्यवस्थित झोपलेला प्रशांत सकाळी असे काही करेल याची कल्पना आली नाही. मी सकाळी आमचे इस्त्रीचे दुकान उघडायला गेलो होतो. मी घरी असतो तर त्याने माझाही जीव घेतला असता की नाही, हे माहीत नाही.