खानापूर : राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या रिक्त असलेल्या १९५ शिक्षकपदांचा तातडीने समावेश करून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पात्र डीएड व बीएड उमेदवारांना समान संधी द्यावी, अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे केली आहे.
आमदार हलगेकर यांनी शुक्रवारी (दि. २१) बंगळूरमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिक्षण खात्याने राज्यभरात सुमारे १५ हजार शिक्षकपदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन शिक्षक भरती अधिसूचनेत मराठी तसेच इतर भाषिक अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांचा योग्य समावेश करण्यात आलेला नसल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
खानापूर तालुक्यात शिक्षकांची एकूण २९७ शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यापैकी, १९५ पदे मराठी, ९२ पदे कन्नड आणि १६ पदे उर्दू माध्यमाची आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सध्या बेळगाव विभागात माध्यमिक शिक्षकांची २४० पदे भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कन्नड आणि इंग्रजी माध्यमातील विविध विषयांच्या पदांचा समावेश करण्यात आला असला तरी मराठी माध्यमातील रिक्त पदांचा योग्य प्रकारे समावेश झालेला नसल्याने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होणार आहे. तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या हजारो पात्र तरुणांवर अन्याय होणार आहे.
भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार संविधानातील कलम २९, ३० आणि ३५०-ए अंतर्गत संरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे, मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करणे आणि पात्र उमेदवारांना सरकारी सेवेत प्रवेशाची समान संधी देणे आवश्यक असल्याचे हलगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.