धारवाड : अल्पवयीन दलित मुलीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी दोन मुस्लिम तरुणांना अटक केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. नईमबेग दौलतबेग झोरमनवर (वय २५ रा. हनुमनकोप्प ता. धारवाड) आणि सोहेल मुल्ला (वय २२ रा. उप्पीनबेटगेरी, ता. धारवाड) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. धारवाड तालुक्यातील गरग परिसरात हा प्रकार घडला आहे.
लव्ह जिहाद प्रकरणातून माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर गरग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी पहाटे शिरहट्टी परिसरातून नईमला ताब्यात घेतले. तपासादरम्यान नईमचा मित्र सोहलचे नाव समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी मृत मुलीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्यामधील छायाचित्रे, संदेश आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही संशयितांचा मुलीशी संपर्क असल्याचे समोर आले असून त्याआधारे पुढील तपास केला जात आहे.