बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि. २३) रात्री व गुरुवारी (दि. २४) सकाळी त्यांनी आपल्या समाजातील आमदार व नेत्यांसोबत बैठक घेऊन अलीकडच्या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. मंत्री जारकिहोळींसमवेत समाजातील माजी मंत्री बी. नागेंद्र व के. एन. राजण्णा यांना अडचणीत आणण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
समाजातील १७ आमदार काँग्रेसच्या पाठीशी उभे असतानाही पक्षातीलच काही नेते आपल्या नेत्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा या बैठकीत झाली. या सर्व प्रकरणांमध्ये बाहेरील लोकांपेक्षा सत्ताधारी पक्षातीलच काहीजण आपल्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामळे आता समाजाची एकजूट दाखवून इशारा देण्याची वेळ आली आहे. समाज संघटनेसाठी नोव्हेंबरमध्ये चित्रदुर्गमध्ये मदकरी नायक संमेलन आयोजित करुन राजकीय निर्णय घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. महिनाअखेरीस दिल्लीला जाऊन पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याचे व त्यांनाच या संमेलनासाठी आमंत्रित करण्याचेही ठरवण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष व काही नेते आपल्याशी कशा प्रकारे वागतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आतापासूनच आपल्या राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. मंत्री जारकीहोळी यांच्या प्रकरणाची चौकशी दिल्लीतील ईडी अधिकाऱ्यांनी हाती घेतल्याच्या मुद्यावरही बैठकीत विशेष चर्चा झाली. समाजातील नेत्यांच्या पाठीशी इतर आमदारांनीही ठामपणे उभे राहण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
कुटुंब संकटात
मंत्री जारकिहोळी यांचे बंधू व भाजप आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी आमचे कुटुंब सध्या संकटात सापडले असल्याचे स्पष्ट केले. सध्या कोणताही घाईघाईने निर्णय घेणार नाही. योग्य वेळ पाहून निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.