बंगळूर : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना शनिवारी पुणे-बंगळूर महामार्गावर घडली असून, बंगळूरमधून प्रेसयीचे अपहरण करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियकराने कारमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणत आत्महत्या केली. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ही घटना तुमकूरजवळ घडली आहे. आत्महत्या केलेला युवक अंकोल्याचा रहिवाशी असून, त्याने कारमधून प्रेयसीचे अपहरण केले होते. कारमध्ये आणखी एक गावठी बॉम्ब सापडला आहे.
नागेंद्र (रा. अंकोला, जि. कारवार) असे युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी तो बंगळूरच्या सिद्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या तरुणीच्या हॉस्टेलवर गेला होता. तेथून त्याने तरुणीचे अपहरण करून आपल्या कारमध्ये घातले. तिला घेऊन तो कारवारकडे निघाला होता. दरम्यान, प्रेयसीच्या मैत्रिणींनी तत्काळ पोलिसांत तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
नागेंद्र महामार्गाने कारमधून कारवारकडे निघाला असताना, तुमकूरजवळ त्याचे तरुणीशी जोरदार भांडण झाले. भांडणादरम्यान नागेंद्रने तिच्यावर चाकूने वार केला. चाकूचा वार होताच सदर तरुणी कसाबसा वाहनाचा दरवाजा उघडून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. त्यावेळी तिच्या मदतीसाठी इतर वाहनचालक येताच नागेंद्रने आपल्या कारचा दरवाजा बंद करून अचानक गाडी उडवून देत आत्महत्या केली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, महामार्गावर खड्डा पडला होता. आगीत नागेंद्र हा वाहनातच जळून खाक झाला.
गावठी बॉम्बचा वापर
कार उडवण्यासाठी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुमकूरचे पोलिसप्रमुख व्यंकट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान आणखी एक गावठी जिवंत बॉम्बही आढळून आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.