खानापूर : दरोड्याचा बनाव रचून कापड व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला खानापूर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी रबिऊल आमीन गाझी (वय २९, मूळ रा. बराहीपूर दक्षिण, २४ परगना पश्चिम बंगाल, सध्या रा. दाणे गल्ली शहापूर, बेळगाव), अलीहुसेन कबरुद्दीन मंडल (वय २७, मूळ रा. माधवपुरा तारकेश्वर हुगळी, पश्चिम बंगाल. सध्या रा. भारतनगर खासबाग बेळगाव) या दोघांसह बेळगावच्या सात तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी (दि. २७) त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मूळच्या पश्चिम बंगालच्या कापड व्यापाऱ्याचा बेळगावात व्यवसाय आहे. त्यांची मूळचे पश्चिम बंगालचेच असलेल्या रबिऊल आणि अलीहुसेन यांच्याशी ओळख झाली. हे दोघे गेल्या १० वर्षापासून बेळगावात सुवर्ण कारागीर म्हणून काम करतात. नेहमीच्या ओळखीमुळे कापड व्यापाऱ्याचा या तरुणांवर विश्वास बसला होता. कापड व्यापाऱ्याकडे सोने व मोठी रोख रक्कम असल्याचे पाहून या दोघांनी दरोड्याचा कट रचला.
बेळगावातील एका टोळक्याला या कटात सहभागी करुन घेतले. कापड व्यापाऱ्याला फिरण्याच्या बहाण्याने बाहेर आणतो. यावेळी निर्जनस्थळी गाडी अडवून कापड व्यापाऱ्याला लुटा. त्याला संशय येऊ नये यासाठी आपल्या दोघांनाही मारहाण करुन लुटण्याचा बनाव करा, असा कट रचला.
त्यानुसार २० रोजी कापड व्यापाऱ्याला गोव्याला फिरण्यासाठी जाऊया असे सांगून ते जांबोटीमार्गे निघाले. रात्री आठच्या सुमारास बैलूर क्रॉसजवळ ठरलेल्या प्लॅनप्रमाणे बेळगावच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. तिघांनाही बाहेर काढून पैसे व दागिने काढून देण्याची धमकी देत मारहाण केली. कापड व्यापाऱ्याने आपल्याजवळील सुमारे लाखभर रक्कम त्यांच्या स्वाधीन केली. गाडीमधील अन्य दोघा तरुणांनाही जुजबी मारहाण करुन लुटण्याचे नाटक करण्यात आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लुटल्याचे भासवण्यात आले. पण, हे दागिने बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.