खानापूर : गोव्यातून कर्नाटकात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या सहाचाकी मालवाहू वाहनावर खानापूर अबकारी विभागाने कारवाई करुन सुमारे ४०० लिटर मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून वाहनासह जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख ४० हजार रुपये आहे.
गुरुवारी (दि. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कणकुंबी तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. सिद्धप्पा मारुती बेळ्ळीकुंपे (रा. माडमगेरी, ता. यरगट्टी) आणि मंजुनाथ हणमंतप्पा देसाई (रा. कडबी, ता. सौंदत्ती) यांच्याविरुद्ध कर्नाटक अबकारी कायदा १९६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोव्याहून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे भारत बेंझ (केए २२ सी ०५७१) या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनाच्या मागील भागात विशेष पार्टिशन करुन त्यामध्ये सुमारे ४०० लिटर मद्यसाठा लपवून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. अबकारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अबकारी निरीक्षक मल्लेशी उप्पार, कणकुंबी तपासणी नाक्याचे अबकारी निरीक्षक बाळगौड पाटील, अबकारी उपनिरीक्षक नुरुल्ला खान, कर्मचारी गुंडू पूजेरी, बसवराज विवेकी, प्रकाश नंदी तसेच गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.