Murder Pudhari
बेळगाव

Karnataka Crime : वडिलांसह पत्‍नी, मुलांनीच काढला काटा

जमखंडीत खून प्रकरणाचा उलगडा : पाचजणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

जमखंडी : जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गलगलीजवळ मालमत्तेच्या वादातून एकाचा खून करून त्याचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात फेकण्‍यात आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मृताचे वडील, पत्नी, दोन मुलासह पाचजणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती बागलकोट जिल्हा पोलिस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी दिली.

सिद्धाप्पा भीमप्पा यमगार (वय ५०, रा. जमखंडी) असे मृताचे नाव आहे. मृताचे वडील भीमप्पा सिद्धप्पा यमगार, पत्नी शैलवा सिद्धाप्पा यमगार, मुलगे कडप्पा सिद्धप्पा यमगार, रमेश सिद्धप्पा यमगार आणि मलेप्पा सिद्धप्पा बेलुबी अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.

पोलिस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धाप्पा यमगार यांच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद होता. यासंदर्भातील खटल्याचा निकाल सिद्धाप्पाच्या अपेक्षेप्रमाणे बहिणींच्या बाजूने लागला होता. प्राथमिक तपासानुसार याच कारणावरून सिद्धाप्पाची पत्नी, मुले आणि वडील यांचा त्याच्याशी वाद होता. सिद्धाप्पा भविष्यात उर्वरित मालमत्ता कुटुंबाबाहेरील लोकांच्या नावावर करेल, अशी भीती संशयितांना वाटत होती. त्यामुळे त्‍यांनी सिद्धाप्पाच्या खुनाचा कट रचला. सिद्धाप्पाचा खून त्याच्या शेतजमिनीत करण्‍यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह गलगलीजवळ कृष्णा नदीच्या पात्रात फेकण्यात आला.

सिद्धाप्पा बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या बहिणींनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना खुनाचा संशय होता. त्‍यादृष्‍टीने पोलिसांनी तपास केला असता या प्रकरणाचा उलगडा झाला. जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT