Karnataka Water Crisis Pudhari
बेळगाव

Karnataka Water Crisis: जलजीवनचा खेळ; पाणीटंचाईची वेळ

तळावडेत भीषण जलसंकट : ग्रामस्थांचा संताप, तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : ‘घराघरांत शुद्ध पाणी’ हे स्वप्न दाखवणारी जलजीवन मिशन (जेजेएम) योजना खानापूर तालुक्यातील अनेक गावांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांची उध्वस्त अवस्था, अर्धवट स्थितीत असलेली कामे आणि नियोजनाचा अभाव यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जांबोटी परिसरातील अतिदुर्गम तळावडे गावात तर या योजनेच्या कामामुळे गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

गोल्याळी ग्रामपंचायत हद्दीतील तळावडे गावाची तहान भागविणारा एकमेव आधार म्हणजे राई जंगलातील नैसर्गिक झरा. गावापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील या झऱ्यातून पाईपलाईनद्वारे अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जलजीवन मिशनंतर्गत नव्या जलवाहिनीच्या कामासाठी केलेल्या खोदाईदरम्यान जुन्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. परिणामी अनेक ठिकाणी गळती सुरु झाली असून झऱ्याचे पाणी वाया जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी कंत्राटदार तसेच ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अद्यापही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

यंदाच्या उन्हाळ्यात झऱ्याच्या पाण्याचे प्रमाण आधीच घटले असताना गळतीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी गावकऱ्यांवर घागरभर पाण्यासाठीही संघर्ष करण्याची वेळ आली आहे. “निसर्गाने दिलेले पाणी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हिरावले गेले,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नुकतीच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांची भेट घेऊन समस्या मांडली. मेत्री यांनी गावाला भेट देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाई; पावसाळ्यात अंधार

तळावडे ग्रामस्थांच्या समस्या केवळ पाण्यापुरत्याच मर्यादित नाहीत. दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो तर पावसाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गाव अनेक दिवस अंधारात बुडते. त्यामुळे, पावसाळ्यापूर्वी आमटे–तळावडे वीजवाहिनीची तातडीने दुरुस्ती करुन अखंडित वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामस्थांच्या या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT