Child murder  Online Pudhari
बेळगाव

Karnataka Crime: आयव्हीएफ तंत्राने जन्मलेल्या जुळ्या मुलींची हत्‍या

मातेचेच कृत्य, चार महिन्यांपूर्वी झाला होता जन्म

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : लग्‍नानंतर बरीच वर्षे मूल न झाल्याने आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्राचा वापर करून गर्भधारणा झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वी जन्मलेल्या जुळ्या मुलींची मातेनेच हत्‍या केल्याचा खळबळजनक प्रकार बंगळूरमध्ये तळघट्टपूर उपनगरात घडला आहे. दोन्ही मुलींना पाण्यात बुडवून मारल्यानंतर मातेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बचावली असून, तिच्यावर बंगळूरच्या निमहान्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उमादेवी (वय ४२) असे निर्दयी मातेचे नाव आहे. रामलिंगाप्पा असे तिच्या पतीचे नाव असून, त्यांचे लग्‍न दहा वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, मूल होत नसल्याने दाम्‍पत्याने गेल्या वर्षी आयव्हीएफ उपचार घेतले. त्यातून उमादेवीने गेल्या ५ मे रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळ्या मुलींच्या जन्मानंतर महिनाभर दांपत्याच्या घरात हर्षोल्हास होता. मात्र त्यानंतर उमादेवीच्या वर्तणुकीत बदल दिसू लागला. मुलींना अनाथाश्रमात पाठविले पाहिजे, असे उमादेवी म्हणत होती. शिवाय तिने जुळ्या मुलींची पुरेशी काळजी घेणेही बंद केले होते. मात्र रामलिंगाप्पा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय तिच्यावर निमहान्स रुग्णालयात उपचारही दिले जात होते. प्रसूतीनंतरच्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मातेचे अपत्याप्रती प्रेम, काळजी कमी होऊ शकते, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता.

मंगळवारी दुपारी रामलिंगाप्पा बाहेर गेल्याचे निमित्त साधून उमादेवीने चार महिने वय असलेल्या दोन्ही मुलींचा पाण्यात बुडवून खून केला. त्यानंतर स्वत:ला दुपट्ट्याचा गळफास घेतला. काही वेळानंतर रामलिंगाप्पा घरी परतला असता त्याला घराचे दार आतून बंद दिसले. हाका मारूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्याने घराचा दरवाजा मोडला असता त्याला उमादेवी दुपट्ट्याने लटकताना आढळली तर दोन्ही मुलींचे मृतदेह बाजूला पडले होते.

रामलिंगप्पाने उमादेवीची गळफासातून सुटका केली. त्यानंतर त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उमादेवीला मानसोपचारांसाठी निमहान्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT