बेळगाव : लक्ष्मी यात्रेला आलेला तरुण पत्नीसोबत कपडे धुण्यासाठी तलावावर गेला असताना, तलावात बुडून मृत पावला. त्याची पत्नी आणि चुलत सासू कपडे धूत असताना त्यांच्यासमोरच त्याचा बुडून मृत्यू झाला. बसवराज मारुती माळगी (वय 32, करगुप्पी, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बंबरगा (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली.
अधिक माहिती अशी की, बसवराज हा मूळचा करगुप्पी येथील आहे. त्याची चुलत सासू बंबरगा येथे राहत असून सध्या या गावची लक्ष्मीदेवी यात्रा सुरू आहे. यात्रेसाठी बसवराज, पत्नी शिल्पा व तीन मुलांसह आला होता. दोन दिवस यात्रा झाल्यानंतर घरी धुण्याचे कपडे भरपूर असल्याने शिल्पा व तिची काकू कपडे धुण्यासाठी बंबरगा गावापासून काही अंतरावर असलेल्या हुलेवन तलावाकडे गेले. बसवराजही सोबत गेला होता.
शिल्पा आणि तिची काकू कपडे धूत असताना बसवराज बराच वेळ तलावाच्या काठावर बसला होता. आंघोळ करतो, असे म्हणत काही वेळाने तो पाण्यात उतरला, पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तो बुडू लागल्यानंतर चुलत सासू व पत्नीने ओरडायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर आसपसाचे लोक घटनास्थळी आले. तत्पूर्वी बसवराज बुडाला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिसांत नोंद झाली आहे. निरीक्षक सुरेश शिंगे तपास करीत आहेत.
एचईआरएफची मदत
तरुण बुडाल्याची माहिती काहींनी काकती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाऊंडेशन (एचईआरएफ) पथकाला बोलावून घेतले. बसवराज हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने व नियोजनबद्ध शोधकार्य सुरू केल्याने अवघ्या दोन तासांत तरुणाचा मृतदेह सापडला. सूरज राक्षे, कार्तिक पाटील, प्रकाश पाटील यांनी या कार्यात सहभाग घेतला.