बंगळूर ः गृहनिर्माण खात्याने बेळगावसह कित्तूर कर्नाटक प्रदेशातील झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी 42,345 घरे बांधली आहेत. ही घरे सोमवारी (दि. 19) लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. तर शनिवारी (दि. 24) हुबळीत होणाऱ्या कार्यक्रमात घरकुलांच्या हक्कपत्रांचे वाटप होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जमीरअहमद खान यांनी दिली.
ते म्हणाले, घरकुलांच्या हक्कपत्रांबाबत सोमवारी (दि. 19) हुबळीत एक बैठक होणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरांचे मालकी हक्क वाटप केले जाईल. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्री, आमदार या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमात दोन लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील लोकांना आणण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सिद्धरामय्या यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना 1,80,253 घरे मंजूर केली होती. एका घराच्या बांधकामासाठी 7 लाख रुपये खर्च येतो. केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत 1.50 लाख रुपयांचे अनुदान देते. मात्र, त्यावरही 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त लाभार्थ्यांना 4.50 लाख रुपये भरावे लागतात. पण, राज्य सरकारने लाभार्थ्यांकडून फक्त 1 लाख रुपये घेतले आहेत आणि उर्वरित रक्कम घरांच्या बांधकामावर खर्च करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
हुबळीत बांधलेल्या 1,300 पैकी 1,008 घरांचे वाटप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे यादगीर, तुमकुर, बिदर, बळ्ळारी, चित्रदुर्गसह विविध ठिकाणी बांधलेल्या घरांच्या वाटपाचा प्रारंभ करतील. राज्यातील 1 लाखाहून अधिक लोकांना अद्याप हक्कपत्र देण्यात आलेली नाहीत. शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात रायचूर, धारवाड, गदग, कोप्पळ, बेळगाव, विजयपूर, बागलकोट जिल्ह्यातील 20,345 रहिवाशांना हक्कपत्र देण्यात येतील. घरमालकांचे कागदपत्रे वाटण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात आले आहेत, असे मंत्री खान यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार प्रसाद अब्बय्या म्हणाले, आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्यानंतर घरांचे वाटप करण्याचा हेतू होता. त्यामुळे घरांचे वाटप करण्यास विलंब झाला आहे. येथे बांधण्यात आलेल्या गृहसंकुलात रुग्णालय, ग्रंथालय आणि सामुदायिक सभागृहासह सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
तिसऱ्या टप्प्यात 30 हजार घरे
2024 मध्ये पहिल्या टप्प्यात 36,779 घरांचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 42,345 घरांचे वाटप करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात एप्रिल किंवा मे महिन्यात 30 हजार घरांचे वाटप करण्यात येईल. तसेच, राजीव गांधी आश्रय योजनेंतर्गत लवकरच 47,860 घरांचे वाटप करण्यात येईल, असेही मंत्री खान यांनी सांगितले.