Priyank Kharge 
बेळगाव

Priyank Kharge: संघाची नोंदणी, वैधानिक दर्जा जाहीर करा

कर्नाटकचे गृहमंत्री खर्गे यांचे भागवत यांना आवाहन; शतकपूर्तीबद्दल अभिनंदनही!

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी कोणत्या कायद्याखाली झाली आहे, संघाला मिळणाऱ्या देणग्यांचा स्रोत आणि खर्च, संघाने देश उभारणीत दिलेले योगदान जाहीर करावे, असे खुले पत्र कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी सरसंघसंचालक मोहन भागवत यांना पाठवले आहे. एकूण सात मुद्द्यांवर खर्गेंनी भागवत यांना खुलासा करण्याचे आवाहन केले आहे. पत्राला उत्तर देताना भागवत यांनी, ‘हिंदू धर्माचीही नोंदणी झालेली नाही,’ असा पलटवार केला आहे. त्यावर खर्गे यांनीही, ‘मी हिंदू धर्माची नव्हे, आरएसएसची नोंदणी मागितली आहे,’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

गृहमंत्री खर्गे यांनी आपल्या दोन पानी पत्रात संघाच्या कामाकाजाबाबत एकूण आठ मुद्दे उपस्थित केले आहेत. संघटनेचा कायदेशीर दर्जा, उत्पन्‍नाचा स्रोत, मालमत्ता व खर्चाचा तपशील, सरकारला भरलेला कर, नोंदणी नसतानाही घेतल्या जाणाऱ्य सभा-बैठका, सामाजिक उत्तरदायित्‍व आणि सभा-पथसंचलनासाठी घेतलेल्या परवानग्या हे ते आठ मुद्दे आहेत.

आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच मंत्री खर्गे यांनी सार्वजनिक क्षेत्रात व्यापक जाळे असलेल्या कोणत्याही संघटनेने पारदर्शकता आणि घटनात्मक वैधतेच्या उच्च मानकांचे पालन करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने प्रसिद्ध केलेल्या २०२५-२६ च्या अहवालाचा हवाला देत त्यांनी संघाच्या कर्नाटकात हजारो शाखा असल्याचा दावा केला आहे. हा संघ लाखो लोकांना सहभागी करून घेणारे सार्वजनिक कार्यक्रम, परिषदा व मिरवणुका आयोजित करतो, ते कशाच्या आधारे हे जाहीर करावे, असेही खर्गेंनी म्हटले आहे.

स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, ट्रस्ट व कंपन्यांनी पाळायचे नियम सर्वांना समान रीतीने लागू झाले पाहिजेत. आरएसएसने आपला शताब्दी सोहळा केवळ एक उत्सव म्हणून न साजरा करता घटनात्मक आत्मपरीक्षणाची संधी म्हणूनही उपयोग करावा, असे आवाहनही खर्गेंनी केले आहे. उत्तर द्यावे किंवा चर्चा करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी पाठवावा, असेही आवाहन खर्गेंनी केले आहे.

मी हिंदू धर्माची नोंदणी विचारलेली नाही. मी संघाची नोंदणी विचारली आहे. इतक्या मोठ्या संघटनेची नोंदणी नसणे ही पारदर्शकता नाही. त्यामुळे उद्दामपणा सोडून कायद्याचे पालन करावे आणि नोंदणीबाबतची कागदपत्रे सादर करावीत.
- प्रियांक खर्गे, गृहमंत्री, कर्नाटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT