बंगळूर : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका मुस्लिम तरुणाने हिंदू महिलेची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर काही तासांनी स्वतःही जीवन संपविले. या घटनेमुळे येलापूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रंजिता भानसोडे (वय 30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, रफीक इमामसाब असे आरोपीचे नाव आहे. दोघेही येलापूरचे रहिवासी होते. रंजिता भानसोडे या अंगणवाडीत स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. शनिवारी काम संपवून घरी परतत असताना आरोपी रफीक इमामसाब याने त्यांच्यावर चाकूने अनेक वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात रंजिता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी सकाळी येलापूर शहरापासून 4-5 कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात रफीकचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लग्नास नकार दिल्याने हत्या
आरोपी रफीक रंजितावर लग्नासाठी दबाव टाकत होता. ते दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. रंजिता यांचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता; पण त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. एका बचत गटाच्या माध्यमातून ते पुन्हा संपर्कात आले. गेल्या काही महिन्यांपासून रफीक रंजिताला लग्नासाठी त्रास देत होता. रंजिताच्या भावाने त्याला समज देऊनही त्याने त्रास देणे थांबवले नाही. अखेर रंजिताने लग्नास ठाम नकार दिल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.