धारबांदोडा/दाबोळी : कुळे येथील मेटावाडा परिसरात दूधसागर नदीत शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. एका युवकाचा जीव वाचला असून त्याने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनेमुळे संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली आहे.
रामण्णा परशू मदार (वय १९), लक्ष्मण परशू मदार (१९) व हिरण्णा परशू मदार (२०) अशी तीन सख्ख्या भावांची नावे असून रामण्णा व लक्ष्मण हे जुळे भाऊ होते. ते नवेवाडा-वास्को येथील रहिवासी असून मूळचे बागलकोट-कर्नाटक येथील आहेत. चौथा मृत विजय साजीली (२१) हा झुआरीनगर येथील रहिवासी होता. बचावलेला राहुल हरीजन याने घटनेचा थरारक तपशील दिला.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७ वाजता वास्को येथून रेल्वेने पाच युवक कुळे येथे अंघोळीसाठी आले होते. तेथून लिफ्ट घेऊन मेटावाडा पुलाजवळ उतरून ते नदीकाठी गेले. नदीपात्राची पाहणी करताना राहुलने पाणी खोल असल्याने येथे अंघोळ करू नये, असा इशारा दिला होता. सुरुवातीला सर्वजण माघारी फिरले. मात्र, त्यानंतर पुन्हा अंघोळ करण्याचा हट्ट धरण्यात आला.
सुरुवातीला पाणी कमी असल्याने ते पुढे गेले. मात्र, नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही गटांगळ्या खाऊ लागले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही बुडाले. ही घटना सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुलने त्यांना वाचवण्यासाठी लाकडाची काठी फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर त्याने धावत जाऊन पुलाजवळून एका दुचाकीस्वाराची मदत घेत कुळे पोलिसस्थानक गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह बाहेर काढले. विच्छेदनासाठी मृतदेह मडगाव येथे पाठवण्यात आले आहेत. उपनिरीक्षक राहुल नाईक यांनी पंचनामा केला असून निरीक्षक सगुण कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.