बेळगाव : शिवम असोसिएट्स असो वा आताची आदित्यराज कॅपिटल कंपनी, गुंतवणूकदारांनी अजिबात चिंता करु नये. गुंतवणुकीची कागदपत्रे असलेल्यांना त्यांची ठेव परत मिळेल. यासाठी निश्चित वेळ सांगणे कठीण असले तरी पुढील सहा महिन्यांत सर्वांना त्यांची रक्कम परत मिळेल अशी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. ते शनिवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या महिन्यात शिवम असोसिएट्सचा गैरकारभार उघडकीस आल्यानंतर आता आदित्यराज कॅपिटलचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे, शिवम व आदित्यराजमधील गुंतवणकूदार सध्या तणावाखाली आहेत. त्यांना गुंतवलेली रक्कम परत मिळणार की नाही याची चिंता लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद देऊन गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
ते म्हणाले, जादा व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या सर्व संस्थांची चौकशी होईलच. परंतु, ज्यांनी येथे गुंतवणूक केली आहे, ते आमिषाला बळी पडलेले लोक आहेत. त्यामुळे, त्यांची ठेव परत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ही कारवाई आम्ही केपीआयडी व बडस् ॲक्टअंतर्गत करत आहोत. याचा सविस्तर अहवाल मी शुक्रवारी सायंकाळी राज्य महसूल विभागाला पाठवला आहे. त्यांच्याकडून तो अहवाल केपीआयडी ॲक्ट विभागाच्या अध्यक्षांना पाठविला जाईल. त्यांनी याची शहानिशा केल्यानंतर पुढे काय करायचे, याची त्यांच्याकडून मार्गसूची येईल. त्या मार्गसुचीनुसार आम्ही काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
चिंता करु नये
पूर्वी असे एखादे प्रकरण घडले तर त्याची संपूर्ण चौकशी राज्य पातळीवरुन होत असे. परंतु, आता या स्थानिक कंपन्यांबाबतचे अधिकार राज्य पातळीवरुन जिल्हा प्रशासनाला अर्थात जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून माझ्याकडे येणार आहेत. त्यामुळे, ज्यांच्या ठेवी अडकल्या आहेत, त्याची शहानिशा करुन त्या लवकर परत करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. या गुंतवणूकदारांना पुढील सहा महिन्यात त्यांची रक्कम परत करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी चिंता करु नये, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जादा व्याजाचे आमिष
शिवम असोसिएट्सबाबत काहीजणांनी फिर्याद दाखल केली आहे. परंतु, या दोन्ही कंपन्यांनी आपली फसवणूक केली आहे, अशी तक्रार करण्यास कुणीही पुढे आलेले नाही. परंतु, आरबीआय व सेबीचे तसेच सहकार कायद्याचे उल्लंघन करुन कुणी जर जादा व्याजाचे आमिष दाखवत असेल तर अशा कंपन्यांची चौकशी करण्याचा अधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून मला आहे.
काही महिन्यांपूर्वी दोन हजार महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन फसल्याचे सांगत होत्या. भविष्यात मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही आता कारवाई करत आहोत. त्यामुळे, कुणी फिर्याद दिली वा न दिली तरी फारसा फरक पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तपास चांगला; खटलाही मजबूत
शिवम असोसिएट्सबाबत पोलिस आयुक्तालयाने खूप चांगला तपास केलेला आहे. त्यातील सर्व बारकावे तपासून केपीआयडी व बडस् ॲक्ट व आवश्यक तेथे भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हणून तर अजूनही शिवानंद नीलण्णावरला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे, हा खटलाही न्यायालयात मजबूतरित्या चालेल व सर्वसामान्यांना न्याय मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी रोशन यांनी व्यक्त केला.
सात हजार ठेवीदारांची यादी
आतापर्यंत सात हजार ठेवीदारांची यादी मिळाली असून अद्याप तपास बाकी असल्याची माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.