रामनगर : कष्टाने पिकवलेले भात पीक पावसाअभावी डोळ्यांदेखत करपून गेले. पिकाला वाचवण्यासाठी पाण्याची सोयही झाली नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने वाळलेल्या भात पिकावर ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण शेत नांगरुन टाकल्याची हृदयद्रावक घटना जगलबेट ग्राम पंचायत हद्दीतील तिंबोलीत (ता. जोयडा) नुकतीच घडली.
बबन नारायण हणबर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात भाताची लागवड केली होती. सुरुवातीला पीक चांगले बहरल्याने त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, अलीकडच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि पाण्याची उपलब्धता नसल्याने भातपीक पूर्णपणे वाळून गेले. शेतातील जमीनही भेगाळली असून पीक वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. डोळ्यांसमोर कष्टाने उभे केलेले पीक नष्ट होताना पाहून बबन यांनी अखेर ट्रॅक्टरला नांगर जोडून वाळलेल्या पिकासह शेत नांगरुन टाकले. एका बाजूला शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि दुसऱ्या बाजूला हातात न आलेले पीक, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची अनिश्चितता या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. दरम्यान, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिंबोलीला भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी करावी आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.